पालघर :सद्यःस्थितीत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. ही बदली प्रक्रिया ऑनलाईन प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाकडून संबंधित शिक्षकांची माहिती योग्यप्रकारे दिली जाणे आवश्यक आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून या प्रक्रियेत चांगलाच गोंधळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.
हिंदी आणि गुजराती माध्यमाच्या शिक्षकांना मुभा : जिल्हांतर्गत करण्यात येत असलेल्या या बदल्यांमध्ये हिंदी आणि गुजराती माध्यमाच्या शिक्षकांना पसंती क्रम भरण्याची मुभा मिळालीच नसल्याची बाब समोर आली आहे. जिल्ह्यात या माध्यमाच्या 30 शाळा नसल्याने संबंधित बदलीपात्र शिक्षकांना अर्ज भरता आला नाही. त्यामुळे त्यांच्यावर एकप्रकारे अन्यायच झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय काही शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज दाखल केले नसतानाही त्यांची नावे ऑनलाईन यादीत आली आहेत. अशाप्रकारे बदली प्रक्रियेत प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे ही बदली प्रक्रिया वादग्रस्त ठरली आहे.
मृत शिक्षकाची बदली : शिक्षण विभागाचा गोंधळ केवळ एवढ्यापुरताच मर्यादीत राहिला नसून, बदली प्रक्रियेच्या यादीत दोन महिन्यांपूर्वी मृत्यू पावलेल्या शिक्षकाचीही बदली करण्याचा प्रताप यंत्रणेने केला आहे. बदली करण्यात आलेल्या मृत शिक्षकाचे नाव बाबू दिघा आहे. दि. 13 डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यापूर्वी जोपर्यंत ते कर्तव्यावर हजर होते, त्या कालावधीपर्यंतचे त्यांचे वेतन शिक्षण विभागाद्वारे अदा करण्यात आले होते. या संदर्भात प्रशासनाला माहिती आहे. मात्र, आता बदलीच्या यादीत त्यांचे नाव आल्याने प्रशासनाच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षक बाबू दिघा यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जव्हारचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पाठवणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी ती का पाठवली नाही? तसेच त्यांनी ही माहिती पाठवली असेल तर शिक्षण विभागाकडून याकडे दुर्लक्ष का करण्यात आले? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.