महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भूमिपुत्र बचाव आंदोलनातर्फे पालघरमधील कार्यकर्ते दत्ताराम करबट यांना उमेदवारी - मच्छिमार

भूमिपुत्र बचाव आंदोलनातर्फे पालघरमधील कार्यकर्ते दत्ताराम करबट यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भूमिपुत्र बचाव आंदोलनातर्फे पालघरमधील कार्यकर्ते दत्ताराम करबट यांना उमेदवारी

By

Published : Mar 30, 2019, 8:14 PM IST

पालघर- भूमिपुत्र बचाव आंदोलन, घटक संघटना तसेच संघर्ष समितीच्यावतीने पालघरमधील कार्यकर्ते दत्ताराम करबट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पालघर येथील पत्रकार परिषदेत भूमिपुत्र बचाव आंदोलनाचे काळुराम धोदडे (काका) यांनी ही माहिती दिली.

भूमिपुत्र बचाव आंदोलनातर्फे पालघरमधील कार्यकर्ते दत्ताराम करबट यांना उमेदवारी

आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यातील आदिवासी, शेतकरी, मच्छिमार, भूमिपुत्र तसेच सर्व सामान्यांचा खरा आवाज लोकसभेत पाठवण्यासाठी भूमिपुत्र बचाव आंदोलन, घटक संघटना तसेच संघर्ष समितीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करणारा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांवर सतत संघर्ष करणारे पालघरचे दत्ताराम करबट यांना खासदारकीसाठी उमेदवारी दिली आहे.

धनशक्ती, बाहुशक्तीच्या जोरावर सुरु असलेले प्रस्थापितांचे जनविरोधी संधीसाधू सत्ताकारण मोडून दत्ताराम करबट यांच्या रुपाने जनतेचा बुलंद आवाज लोकसभेत पाठवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. पालघर जिल्ह्यावर अनेक संकटे येत असून येथील जनता मुलभूत सुविधांपासून आजही वंचितच आहे. त्यातच विकासाच्या नावाखाली अनेक विनाशकारी प्रकल्प / योजना लादले जात असल्यामुळे येथील पर्यावरण, आदिवासी, मच्छिमार, शेतकरी, गावकरी, शहरी भूमिपुत्र यांच्यावर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे सागरी, डोंगरी, शहरी भागांचा असलेला व नव्याने उदयास आलेला पालघर जिल्हा आपली ओळख हरवून बसतो की, काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच गेल्या काही वर्षांपासून सर्वसामान्य जनता पर्यावरणाच्या, अस्तित्वाच्या प्रश्नांवर आक्रमक होऊन संघर्ष करत असून त्यासाठी सर्वांनी विचार करण्याची गरज असल्याचे धोदडे यांनी यावेळी म्हटले आहे.

भूमिपुत्र बचाव आंदोलनाच्या माध्यमातून काका यांच्या नेतृत्वाखाली बुलेट ट्रेन, द्रुतगती मार्ग, मुंबर्इ महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA) प्रारुप विकास आराखडा, वाढवण बंदर, किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्रारुप आराखडा (CZMP), CRZ मधील बदल, सागरी महामार्ग, शिपींग कॉरीडोर, वसई- नवघर, अलिबाग मल्टीमॉडल, कॉरीडोर आदी विनाशकारी व येथील स्थानिकांना देशोधडीला लावणाऱ्या विनाशकारी प्रकल्पाच्या मुद्द्यावर सातत्याने लढा सुरू आहे. जिल्ह्यातील शेती, पाणी, रोजगार, वनाधिकार, मासेमारी तसेच नागरी समस्यांवर लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. त्याबाबत लोकसभेत आवाज उठवून काम करवून घेण्यासाठी भूमिपुत्र बचाव आंदोलन दत्ताराम करबट यांच्या रूपाने खासदारकीसाठी उमेदवार उभा करीत आहोत, असे आंदोलनामार्फत जाहीर करण्यात आले.

गेली ५ वर्षे केंद्रात आणि राज्यात सत्तेत राहून आपसात भांडत राहण्याचे नाटक करत युती विनाशकारी प्रकल्प लादत आहे. तसेच सर्व सामान्य जनतेला देशोधडीला लावून जनतेला अच्छे दिनच्या आशेवर झुलवत ठेवणारी युती आता पुन्हा एकदा मतदाराला फसवण्यासाठी सज्ज झाली आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details