पालघर - पालघर व आसपासच्या परिसरात शुक्रवारी पहाटेपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. ऐन हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने मच्छिमारांनी सुकण्यासाठी वाळत घातलेली मच्छी भिजल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने या नुकसानीबाबत त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.
बांबू 'वरणी' वर सुकण्यासाठी ठेवण्यात येतात मासे
मासेमारी करायला समुद्रात जाणाऱ्या मच्छिमारांकडून लहान-मोठे मासेविक्रेते टोपलीच्या भावाने मासे विकत घेतात. एक विक्रेता साधारण दीड- दोन हजारांचे मासे विकत घेतो. हे मासे प्रकारानुसार वेगवेगळे करून रात्रभर बर्फात ठेवले जातात आणि सकाळी ६-७ वाजता समुद्रकिना-यावरच्या बांबूंच्या ‘वरणी’वर सुकवण्यासाठी ठेवतात. काही दिवसांनी मासे सुकले की पुढे वर्षभर ते टिकतात आणि कधीही विकता येतात. बोंबील, मांदेली, कोलबी, सुकट, करंदी, लहान पालेट, वाकटी-पाट्या, लहान शिंगाडा असे सर्वच मासे सुकवले जातात. अर्थात, बोंबलाचे प्रमाण त्यात सर्वाधिक असते.