पालघर - जिल्ह्यात भात पिकाच्या कापणीला शेतकरी वर्गाने सुरुवात केली होती. अशात परतीच्या पाऊस झाला आणि त्यात भात पिकाचे मोठे नुकसान झाले. तर काही भागात वादळी पावसामुळे झाडे पडली.
पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसाची सुरुवात केल्याने भात उत्पादक शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे. वाडा तालुक्यातील सोनाळे भागात जोरदार वाऱ्याने मोठे वृक्ष ही रस्त्यावर पडले. त्यामुळे खर्डी- वाडा या रस्त्याच्या वाहतूक सेवेवर परिणाम झाला. त्याचबरोबर उभी पिके आडवी झाली. तर तलासरी डहाणू भागातही पावसाने मोठे नुकसान झाले.
पालघर जिल्ह्यात 75 हजार 677 हेक्टर क्षेत्र भात पीक लागवडी खाली आहे. यात वाडा तालुक्यातील 14 हजार 19 हेक्टरी क्षेत्र भात पिकाखाली आहे. वसई 7 हजार 391 हेक्टर, डहाणू 15 हजार 219 हेक्टर, पालघर 13 हजार 932, विक्रमगड 7 हजार 131 हेक्टर, जव्हार 6 हजार 505 हेक्टर क्षेत्र आणि 2 हजार 065 हेक्टर क्षेत्रावर भात पीकाची लागवड करण्यात आलेली आहे.