पालघर - शुक्रवारी रात्रीच्या सुमारास डहाणू तालुक्यातील सागरी, डोंगरी आणि नागरी भागात विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला. यावेळी भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
डहाणू तालुक्यात परतीच्या पावसाने भात पिकांचे नुकसान चक्रीवादळाच्या प्रभावामुळे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास डहाणूमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खाचरात कापलेले पीक पाण्यात भिजुन तरंगू लागले होते. ते चिखलातून काढताना शेतकऱ्यांची दमछाक झाली. मात्र इतके करूनही किती पीक वाचवता येईल याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा -तीस हजारी न्यायालयात पोलिसांकडून गोळीबार, वकिलांनी केली वाहनांची जाळपोळ
पालघर जिल्ह्यात भात पीक क्षेत्र ७६५०० हेक्टर असून त्यात ९३%लागवड झाली आहे. ६१३०८ हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्र डहाणू तालुक्यातील आहे. मात्र,या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे .भात कापल्यावर काही दिवस रिमझिम पाऊस होता त्यामुळे आर्द्रतेचे वातावरण निर्माण झाले आणि भात शेतातील कडपावर रुजला.
परंतु शेतातील भाताला दोन ते तीन वेळा उन्हं दाखवले तरी या भातापासून मिळणारा तांदूळ हा खराब प्रतीचा असण्याची शक्यता असणार आहे. कृषी विभाग आपल्या त्रिस्तरीय समितीमार्फत (तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक) नुकसानीचे पंचनामे करीत आहे. तसेच वीमाधारक शेतकऱ्यांचे विमा प्रतिनिधीमार्फत पंचनामे सुरू आहेत. मात्र, मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे . त्यात पावसामुळे चारादेखील काळा पडून त्याला कुबट वास येत असल्यामुळे जनावरे खाणार नाहीत असे या शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.