पालघर - चोरीच्या घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी एका चोरट्याने नवी शक्कल लढविली होती. तो ज्या घरात चोरी करायचा, तिथे पाकिस्तानचा झेंडा ठेवून तो पसार व्हायचा. या चोरट्याला पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटने अटक केली आहे. गौरव उपेंद्र दळवी (20) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याने आणखी गुन्हे केल्याचेही उघड झाले आहे.
...म्हणून 'तो' लुटमार केलेल्या घरात पाकिस्तानचा झेंडा ठेवून पसार व्हायचा - पालघर गुन्हे वार्ता
तपासात पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी एक चोरटा ज्या घरात चोरी करायचा, तिथे पाकिस्तानचा झेंडा ठेवून पसार व्हायचा. या चोरट्याला पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटने अटक केली आहे.
![...म्हणून 'तो' लुटमार केलेल्या घरात पाकिस्तानचा झेंडा ठेवून पसार व्हायचा crime-branch-has-arrested-a-thief-who-was-carrying-a-pakistani-flag-to-divert-attention-from-the-investigation](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9058377-thumbnail-3x2-palghar.jpg)
डहाणू तालुक्यातील चिंचणी पाटीलपाडा येथे काशिनाथ पुरुषोत्तम पाटील यांच्या घरी 29 सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास आरोपी गौरव याने प्रवेश करून चोरी केली. त्यानंतर पळून जात असताना शीतल पाटील आणि दीपक सावे या दोघांवर धारधार शस्त्राने वार करून त्यांना जखमी केले. त्यानंतर या प्रकरणी वाणगाव पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात भादंविच्या कलम 392, 394, 457 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटने घटनास्थळी पाहणी केली. गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल घटनास्थळी ठेवूनच हा चोरटा पसार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी अधिक तापस व चौकशी केली असता याआधी देखील या परिसरात अशा प्रकारचे घटना घडल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी दोन दिवस एका संशयित आरोपीवर पाळत ठेवली. त्यानंतर फिल्मी स्टाईलने पाठलाग करत गौरव उपेंद्र दळवी या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटने अटक केली आहे. पोलिसांचे तपासातून लक्ष विचलित व्हावे, यासाठी तो लुटमार केलेल्या घरात पाकिस्तानचा झेंडा ठेवून जात होता, असे आरोपीने चौकशी दरम्यान सांगितले आहे.