पालघर -जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील अदानी डहाणू थर्मल पॉवर स्टेशनवर स्थानिक जनतेच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नांबरोबरच स्थानिकांना रोजगार आणि डहाणू परिसरातील 15 किलोमीटर अंतरावरील नागरिकांना वीज पुरवठा मोफत करावा ही मागणी करण्यात आली.
हेही वाचा -आदिवासी भागातील शाळा सुरू करण्यासाठी मोर्चा
आमदार निकोले म्हणाले की, ज्यावेळी हा प्रकल्प तयार करण्यात आला त्यावेळी स्थानिक जनतेच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण, आज २७ वर्षे उलटून देखील मागण्यांची पूर्तता झालेली नाही. येथील व्यवस्थापन झोपलेल्या अवस्थेत असून त्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यांना खडबडून जागे करण्याच्या अनुषंगाने हे पाऊल आम्हाला जनतेच्या व कामगारांच्या वतीने उचलावे लागत आहे. या प्रसंगी हजारोंच्या संख्येने जनता रस्तावर उतरली. या अदानी मॅनेजमेंटचे करायचे काय ? खालती डोके, वरती पाय, अशी जोरदार घोषणाबाजी केली.