पालघर-डहाणू तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील कोरोना तपासणीसाठी घेण्यात येणारे घशातील स्त्रावाचे नमुने मुंबईला पाठवण्याची गरज भासणार नाही. कोरोना नमुना चाचणी केंद्र सुरु झाल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी हिंगणे यांनी दिली आहे. सुरुवातीला येथे दररोज 20 चाचण्या केल्या जाणार असून उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्राच्या इमारतीत हे चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
आता पालघरमध्येच होणार कोरोनाची चाचणी; डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात तपासणी केंद्र सुरू - कोरोना नमुना चाचणी केंद्र डहाणू
जिल्ह्यातील डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातील आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्राच्या इमारतीत कोरोना नमुना चाचणी केंद्र सुरु करण्यात आले आहे. सुरुवातीच्या काळात येथे प्रतिदिन 20 नमुने तपासले जाणार आहेत. पालघर जिल्ह्यात कोरोना नमुना चाचणी केंद्र सुरु झाल्याने नागरिकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
डहाणू येथे कोरोना नमुना चाचणी केंद्र सुरु करण्यापूर्वी पालघर जिल्ह्यातून कोरोना तपासणीसाठी घेण्यात आलेले घशाचे नमुने तपासणीसाठी मुंबईत पाठवले जात होते. यामुळे तपासणी अहवाल प्राप्त होण्यासाठी तीन ते चार दिवसाचा कालावधी लागत होता. मात्र,आता डहाणू उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्राच्या इमारतीत कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध झाली आहे. या केंद्रामुळे कोरोना तपासणी अहवाल प्राप्त होण्याचा कालावधी कमी होणार आहे.
पालघर जिल्ह्यात कोरोना नमुना चाचणी केंद्र सुरु झाल्याचा कोरोनाबाधित रुग्ण, आरोग्य विभाग आणि प्रशासनाला होणार आहे. अहवाल लवकर प्राप्त होणार असल्याने प्रतिबंधात्मक उपाय करणे सोईचे ठरणार आहे. कोरोना नमुना चाचणी केंद्राची सुविधा जिल्ह्यात सुरु झाल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, सहाय्यक जिल्हाधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वाणेरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र केळकर, आरसीएमआरचे संचालक डॉ. महाले यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.