पालघर -केंद्र सरकारने पारीत केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे असून, हे तीनही कायदे मागे घेणे शक्य नाही. प्रत्येक कायद्याला विरोध होत असतो. वारंवार कायदे मागे घेतल्यास संविधान धोक्यात येईल, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले पालघर दौऱ्यावर आले असता, आयोजित पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी बोलत होते.
रामदास आठवले यांची प्रतिक्रिया तर संविधान धोक्यात येईल -
शेतकऱ्यांच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत. इतक्या थंडीत पावसात शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांनी काहीतरी मार्ग काढायला हवा, अशी विनंती रामदास आठवले यांनी शेतकऱ्यांना केली आहे. कायदे मागे घ्या, अशी मागणी वारंवार होऊ लागली, तर या देशाचे संविधान धोक्यात येईल. संसदेला काही काम राहणार नाही. संसदेने पास केलेले कायदे अमलात आणण्याची जबाबदारी सर्वांची आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होण्यामध्ये शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - २१व्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी भरला अर्ज; झाली राज्यातील सर्वात तरुण सरपंच!