पालघर - राज्यात विविध भागांमध्ये कोरोनाची प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना आखत आहे. जिल्ह्यात ताप असणाऱ्या प्रत्येक रुग्णाची चाचणी करण्याच्या सूचना पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी शल्यचिकित्सकांना दिले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकार्यांनी वैद्यकीय अधिकारी तसेच खासगी डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय संघटनेचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत एका बैठकीचे आयोजन केले होते.
हेही वाचा -मुंबई : कंगनासह चार जणांवर पुन्हा गुन्हा दाखल, वाचा...
तापाचा रुग्ण आल्यास अँटीजेन चाचणी करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची सूचना:-
जिल्ह्यात कोणत्याही वैद्यकीय अधिकारी किंवा खाजगी डॉक्टरकडे तापाचा रुग्ण आल्यास त्यांची अँटीजेन टेस्ट करण्याच्या सूचना पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात अँटीजेन टेस्टकरिता आवश्यक किट उपलब्ध असून आवश्यकता भासल्यास आरटीपीसीआर टेस्ट देखील करून घ्यावी असे बैठकीत सुचविण्यात आले. ताप व कोरोनाची लक्षणे असणारे काही रुग्ण परस्पर एचआरसिटी (हाय रिझर्वेशन सिटी स्कॅन) परस्पर करून घेत असल्याचे निदर्शनास आले असून अशा केंद्रांवर तपासणी करणाऱ्या रुग्णांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत अशा रुग्णांची घरी जाऊन अँटीजेन टेस्ट करून घेण्याची व्यवस्था सुरू करण्यात येईल असे पालघरचे जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत सांगितले आहे.
नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याचे आवाहन:-
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तसेच खासगी डॉक्टर यांनी नागरिकांना अधिकाधिक प्रमाणात कोरोन प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. लस घेण्यासाठी रुग्णांचे मतपरिवर्तन करणे, सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे तसेच हाताचे निर्जंतुकीकरण करणे आदींसह शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन पालघरचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
हेही वाचा -वीज बिल माफीसाठी 19 मार्चला राज्यभर महामार्ग रोको आंदोलन; राजू शेट्टींची माहिती