पालघर -विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पाच जुलैपासून सुरू होणार आहे. कोरोनाचे संकट आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसांत गुंडाळण्यात येणार आहे. राज्य विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकेची झोड उठवली आहे. विरोधकांच्या भीतीमुळे पावसाळी अधिवेशन दोनच दिवसांचे ठेवले असल्याची टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते पालघरमध्ये बोलत होते.
चंद्रकांत पाटील आज पालघर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कोरोना काळात मृत्यू झालेल्या पालघर जिल्ह्यातील 37 भाजपा कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेत पालघर जिल्ह्यातील 37 भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी जीव गमावला असून, ही भाजपासाठी न भरून निघणारी हाणी असल्याच्या भावाना यावेळी पाटलांनी व्यक्त केल्या.