पालघर/वसई- वसई, विरार शहरात दरवर्षी नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. मात्र यंदा नाताळच्या उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वसई, विरार परिसरातील चर्चकडून चर्चमध्ये येणाऱ्या नागरिकांवर काही बंधने घालण्यात आली आहेत. ख्रिस्ती बांधव देखील नियमांचे पालन करून, नाताळचा सण साजरा करताना दिसत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसईतील ख्रिस्ती बांधव हा सण साधेपणाने साजरा करत आहेत. कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी यंदाच्या वर्षी सर्व सण साधेपणानेच साजरा केले जात आहेत. नाताळ देखील अतिशय साधेपणाने आणि गर्दी न करता ख्रिस्ती बांधवांनी साजरा केला. यंदा प्रथमच ख्रिस्त जन्माची गीते असलेले कॅरल सिंगिंगचे कार्यक्रम देखील ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले. तसेच नाताळनिमित्ताने होणारे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहेत.