पालघर - मुसळधार पावसामुळे सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. दरम्यान, जोरदार पावसाने वेवूर येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून एका चालकाने कार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने चारचाकी जवळपास १०० मीटर वाहत जाऊन एका झाडाच्या मुळाला अडकली.
पालघरमध्ये पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली चारचाकी; दोन प्रवाशांना बाहेर काढण्यात यश - heavy rain in palghar
जोरदार पावसाने वेवूर येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून एका चालकाने कार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने चारचाकी जवळपास १०० मीटर वाहत जाऊन एका झाडाच्या मुळाला अडकली.
संंबंधित प्रकार स्थानिकांनी पाहिला; आणि तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. कारमध्ये प्रवास करत असलेल्या दोघांना कारची मागील काच फोडून सुखरुप बाहेर काढण्यात आले. स्थानिकांच्या प्रयत्नांनी दोघांचा जीव वाचला. त्यामुळे जीवितहानी टळली आहे. साचलेले पाणी ओसरल्यानंतर स्थानिकांनी धक्का मारत ही गाडी बाहेर काढत रस्त्यावर आणली. स्थानिकांच्या केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, मागील दोन दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. मुख्य शहरासोबतच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकणी पाणी साचले आहे. काही सोसायट्यांमध्येदेखील पाणी साचल्याने घरगुती वस्तू खराब झाल्या आहेत.