पालघर- थंडीची चाहूल लागताच अनेक दूरदेशी पाहुण्यांचे पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात आगमन होते. परदेशी पक्षांच्या स्थलांतराला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील खाडी क्षेत्र आणि किनारपट्टी भागांत स्थलांतरित देशी-परदेशी पक्षांची हजेरी लागल्याचे पहावयास मिळत आहे. पालघर जिल्ह्याच्या पाणथळ जागा, तलाव, खाडी व समुद्रकिनारी या तपकिरी डोक्याचा कुरव (Brown Headed Gull) पक्षांचे आगमन झाले आहे. सध्या या कुरव पक्षांचे थवे आपल्याला हवेत उडताना, पुलांवर किंवा तलावाच्या कट्ट्यावर दिसू लागले आहेत.
थंडीची चाहूल.. पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर तपकिरी डोक्याचा कुरव (Brown Headed Gull) पक्षांचे आगमन निसर्गात ऋतुनुसार सतत बदल होत असतात, निसर्गातील या बदलांप्रमाणेच दरवर्षी नियमितपणे होणारे पक्ष्यांचे स्थलांतर हा या बदलाचाच एक भाग आहे. जगण्यासाठी आवश्यक असलेले चांगले पर्यावरण, पोषक आहार, प्रजनन आणि पिलांच्या संगोपनासाठी चांगला अधिवास शोधण्याकरिता दूर अंतरावरून स्थलांतर करत पक्षी येतात. वर्षांच्या एका विशिष्ट कालावधीत त्यांचे स्थलांतरण होते. काही पक्षी अन्न आणि प्रजननासाठी वर्षांच्या वेगवेगळ्या हंगामात स्थलांतर करतात. तपकिरी डोक्याचा कुरव (Brown Headed Gull) -
कावळ्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचे पांढरे पक्षी म्हणजेच कुरव. कुरव पक्षांच्या बऱ्याच जातींपैकी एक तपकिरी डोक्याचा कुरव या पक्षाचे शास्त्रीय नाव क्रोईकोसेफालस ब्रुनोसेफालस असे आहे. क्रोईकोसेफालस म्हणजे विशिष्ट रंगाचे डोके असलेला व ब्रुनोसेफालस म्हणजे तपकिरी रंगाशी निगडीत असलेला. कुरव पक्षांच्या पिसांच्या रंगामध्ये विणीच्या हंगामानुसार व वयोमानानुसार अनेक बदल होतात. जेव्हा हे पक्षी हिवाळ्यात येतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्याचा रंग तपकिरी नसतो. पण मार्च- एप्रिलदरम्यान त्यांना तपकिरी रंगाची पिसे येतात. नर व मादी दिसायला सारखेच असले तरी पिल्लांचा रंग सुरुवातीच्या काही वर्षांपर्यंत थोडा वेगळा असतो. वयस्क नर व मादिच्या पंखांचा रंग फिकट राखाडी व पोट पांढरे असते. पंखांच्या कडा काळ्या असून त्यावर पांढरे चट्टे असतात. चोच लाल रंगाची असून पांढरे डोळे व त्यात काळी बाहुली असते. गालावर काळसर डाग असतो. विणीच्या हंगामात चेहऱ्याचा भाग पूर्ण तपकिरी होतो.
..म्हणून हे पक्षी भारतातील कमी थंडीच्या प्रदेशात दाखल होतात
भारतीय उपखंडात भारताबरोबर मंगोलिया, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, श्रीलंका या देशातही यांचा वावर असतो. पाण्यातील मासे, मृदुकाय जीव, मृत प्राण्यांचे अवशेष हे त्यांचे प्रमुख अन्न आहे. हिवाळ्यामध्ये हिमालयामधील नद्या व सरोवरे बर्फाने गोठल्यामुळे या पक्ष्यांना अन्न मिळवणे कठीण होते. म्हणूनच हे पक्षी भारतातील कमी थंडीच्या प्रदेशात दाखल होतात. मे महिन्यापासून यांच्या विणीच्या हंगमला सुरुवात होते व ते पुन्हा हिमालयात निघून जातात. तेथे पाणथळ जागांच्या किनारी भागात गवताच्या कड्या गोळा करून घरटे तयार केले जाते. दोन ते तीन अंड्यांमधून महिन्याभरात पिल्ले बाहेर पडतात. काही महिन्यातच म्हणजे हिवाळा यायच्या आत ते आपल्या पिल्लांना बरोबर घेऊन स्थलांतर करतात.