पालघर -मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या 'आमला' गावाला जोडणारा एकमेव लोखंडी पूल मुसळधार पावसामुळे गारगाई नदीला पूर आल्याने वाहून गेला आहे. यामुळे या गावाचा संपर्क तुटला आहे.
मुसळधार पावसाने पालघर जिल्हा जलमय ; मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम गावातील पूल गेला वाहून - heavy rain
मुसळधार पावसामुळे गारगाई नदीला पूर आल्याने मोखाडा तालुक्यातील मुख्य रस्त्यापासून अतिदुर्गम आमला गावाला जोडणार लोखंडी पूल वाहून गेला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे अनेक नैसर्गिक दुर्घटना घडत आहेत. मोखाडा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे गारगाई नदीला पूर आल्याने येथील अतिदुर्गम असलेल्या 'आमला' गावाला जोडणार लोखंडी पूल वाहून गेल्यामुळे या गावाचा संपर्क तुटला आहे. पालघरपासून ७०-७५ कि.मी अंतरावर एका बाजूने डोंगर तर तिन्ही बाजूने गारगाई नदीचा 3 बाजूने वळसा असे निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव आहे. या गावात ६५ घरे असून लोकसंख्या ३२२ इतकी आहे. भातशेती, भाजीपाला, मोगरा शेती हे येथील लोकांचे मुख्य व्यवसाय आहेत. गावातील ४० कुटुंंब गेल्या ३-४ वर्षापासून मोगरा शेतीमधून उत्पादन घेऊन कुटुंब चालवतात. त्यांना या शेतीतून सप्टेंबर पासून ते जून अखेरीस पर्यंत ५० ते ६० हजारांचे रूपये उत्पादन मिळते. बुधवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या गावातील राजू बार्हात, पांडु धवळू वारे, सोमनाथ किरकीरे, संजय किरकीरे, विष्णु किरकीरे, गौरव किरकीरे, लक्ष्मण किरकीरे आणि राजू वारे या शेतकऱ्यांच्या मोगरा लागवड केलेल्या शेतातून पुराचे पाणी गेल्याने त्यांची मोगरा शेती पूर्णपणे नष्ट झाली आहे.
गावातील लोकांना पावसाळ्यात ग्रामस्थांना गावाबाहेर जाणे-येणे शक्य नव्हते, खूप आजारी रुग्ण असेल तर ग्रामस्थ डोली बनवून ५-६ किमीचे अंतर डोंगर चढून दवाखान्यापर्यंत रुग्णांना पोहचवत होते. त्यामुळे अर्धवट खांबाचा वापर करन याठिकाणी ग्रामस्थ आणि आरोहन संस्थेच्या पुढाकाराने २०१४-१५ मध्ये लोखंडी साकव बांधण्यात आला होता. गेली ४-५ वर्षे या साकवमुळे पावसाळ्यात देखील लोकांना बााजारपेठेत जाता येत होते. मात्र, तिन्ही बाजूने नदीचा वेढा असलेला आणि नदी पार करुन गावात जाण्यासाठी असलेला एकमेव लोखंडी पूल वाहून गेल्यामुळे गावाचा सर्वच बाजूंनी संपर्क तुटला आहे.