पालघर - आगामी निवडणुकांसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युतीविषयी जोरदार चर्चा सुरु असून युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चर्चेत पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला देण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, ही जागा सोडण्यास भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामाअस्त्र उगारले आहे.
पालघरची जागा सेनेला देण्यास भाजप कार्यकर्त्यांचा विरोध, उगारले राजीनामा अस्त्र
पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला देऊ केल्याची चर्चा असून, जिल्हा भाजपमध्ये या निर्णयाविरोधात नाराजी असल्याचे पाहायला मिळाले.
पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला देऊ केल्याची चर्चा असून, जिल्हा भाजपमध्ये या निर्णयाविरोधात नाराजी असल्याचे पाहायला मिळाले. याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. विक्रमगड तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्षकडे राजीनाम्याचे पत्र दिले आहे. लोकसभेची जागा भाजपने मित्रपक्षाला दिल्यास जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सामुदायिक राजीनामा देतील असा इशारा देखील दिला आहे. पालघर जिल्ह्यात भाजपचा खासदार, दोन आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच ४ पंचायत समितीवर भाजपचे सभापती आहेत. असे असतानाही जागा मित्रपक्षाला देण्यात आल्याची चर्चा असल्याने जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी नाराज झाले आहेत. पालघर लोकसभेची जागा भाजपनेच लढवावी भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची मागणी आहे.
भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष व आमदार पस्कल धनारे यांच्या अध्यक्षतेखाली मनोर येथे जिल्हा भाजप कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत पालघरची जागा मित्रपक्षाला देण्यात आल्यास आगामी निवडणुकांवर मोठा परिणाम होईल, अशी चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पास्कल धनारे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.