पालघर -पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी भारतीय जनता महिला मोर्चाच्यावतीने पालघरमध्ये आंदोलन करण्यात आले. पालघर येथील हुतात्मा स्तंभ येथे आंदोलन करण्यात आले. संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, पूजा चव्हाणला न्याय द्या, महाविकास आघाडीचा निषेध असो, अशी घोषणाबाजी करत महाविकास आघाडी सरकारचा महिला मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात आला.
हेही वाचा -रेल्वे रुळावर आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला आरपीएफ जवानांनी दिले जीवदान
याबाबत पालघरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. संजय राठोड यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करा, अन्यथा अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपच्या महिला कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांनी दिला.
7 फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाण हिचा मृत्यू झाला होता. मात्र, अद्याप पोलिसांनी या घटनेबाबत प्राथमिक माहिती अहवाल दाखल केलेला नाही. पूजा संदर्भातील ध्वनिफितीबाबत संबंधित व्यक्तीची पोलिसांनी चौकशी केली नाही. पोलिसांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे. पूजाच्या मृत्यूबाबत जे पुरावे समोर आले, त्यातून या प्रकरणाशी संजय राठोड यांचा संबंध असल्याचे दिसून येते, असा आरोप भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाने केला. त्यामुळे, राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाने केली.
हेही वाचा -बर्ड फ्लूच्या शिरकाव्यानंतर बाधित 1 किमी परिसरातील चिकन दुकाने बंद