पालघर - शहरात येत्या 3 मार्चला "विनामूल्य भव्य अटल आरोग्य शिबिराचे" आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या आयोजनासाठी आदिवासी विभाग विकास विभागाकडून ९५ लक्ष रुपयांचे अर्थसाह्य घेण्यात आले आहे. असे असताना या शिबिराच्या आयोजनाचे श्रेय उपटण्याचा प्रयत्न भाजपचे स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी घेण्याचा प्रयत्न करीत आहे. जिल्ह्याच्या नुतन प्रशासकीय इमारतीजवळ या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या जाहिरात बोर्डवर भाजपचे चिन्ह कमळ आणि पदाधिकाऱ्यांचे फोटो झळकवित हा कार्यक्रम भाजप पुरस्कृत, पक्षाच्या फंडातूनच या शिबिराद्वारे रुग्णांचे उपचार केले जाणार आहेत, असे भासवून येणाऱ्या निवडणुकीत "मतांची"गणिते आखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. पालघरमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता भंग झाल्याची तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
हे शिबिर ३ मार्चला असून या आधीच जिल्ह्यातील विविध भागातील नागरिकांची तपासणी प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. या तपासणी प्रक्रियेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रवासासाठी भाजप कार्यकर्ते सरसावले असून या शिबिराच्या निमित्ताने मतदारानापर्यंत पोहोचण्यासाठी पक्ष कार्यकर्ते धडपड करताना दिसत आहे.
या भव्य आरोग्य शिबिरासाठी आदिवासी विकास विभागाकडून तब्बल ९५ लक्ष रुपये मंजूर झाले असून या शिबिरासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच संपूर्ण वैद्यकीय विभाग कामाला लावण्यात आले आहे. या शिबिराच्या आयोजनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आतापर्यंत ३ आढावा बैठक घेण्यात आल्या असून या बैठकांमध्ये भाजपचे स्थानिक पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले होते. यामुळे अनेक जिल्ह्यातील कनिष्ठ अधिकाऱ्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचनेच्या अनुषंगाने कामे करावी लागत असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांच्याकडून खाजगीत सांगण्यात येत आहे.
महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने येणारे डॉक्टर आणि इतर वैद्यकीय सेवेतील सलंग्न कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय तसेच खानपानाची सोय स्थानिक भाजप कार्यकर्त्यांवर सोपवण्यात आली आहे. शिबिरासाठी अपेक्षित १ लाख रुग्णांना आणण्याची तसेच त्यांना पुन्हा परत घरी घेऊन जाण्याची जबाबदारी ठिकठिकाणच्या भाजप कार्यकर्त्यांवर सोपवली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये "दिवंगत खासदार एडवोकेट चिंतामण वनगा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित भव्य आरोग्य शिबिर" हे भाजप पक्षाच्या मार्फत आयोजित केले जात असल्याचा आभास निर्माण होत असल्याचे आरोप राजकीय पक्षांकडून होऊ लागले आहेत.