पालघर -मीरा भाईंदर महानगरपालिकेमधील नगरसेविका वर्षा गिरीधर भानुशाली यांना लाचखोरी प्रकरणी ठाणे न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. वर्षा भानुशाली यांना न्यायालयाने 5 वर्षांचा कारावास आणि 5 लाखांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
हेही वाचा... 'महाराष्ट्र सरकारची 'स्थगिती सरकार' म्हणून गिनीज बुकमध्ये नोंद होईल'
वर्षा भानुशाली यांचे हे लाचखोरीचे प्रकरण 2014 सालचे आहे. याप्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान ठाणे जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी त्यांना 5 वर्षाचा कारावास आणि 5 लाखांचा दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास आणखी 6 महिन्यांचा कारावास त्यांना भोगावा लागेल, असेही न्यायालयाने सांगितले आहे.
हेही वाचा... आता बाळासाहेब हिंदुहृदयसम्राट नाही तर वंदनीय, चंद्रकांत पाटलांचा सेनेवर निशाणा
वर्षा भानुशाली 2007 मध्ये पहिल्यांदा अपक्ष नगरसेविका म्हणून भाईंदर पूर्व भागातून निवडून आल्या. त्यानंतर 2012 व 2017 मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवित भाईंदर पश्चिमच्या मुर्धा, राई, मोरवा, आंबेडकरनगर भागातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या.
हेही वाचा.... औरंगाबादमार्गे नागपूरला जाणार बुलेट ट्रेन? चाचपणीला सुरुवात
काय आहे नेमके प्रकरण ?
6 जून 2014 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे पथकाने सापळा रचून भानुशाली यांना भाईंदरच्या मॅक्सस मॉल समोरील जानकी हेरिटेज इमारतीतील राहत्या घरात लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. एका गाळ्याची बेकायदेशीर उंची वाढवण्यासाठी त्यांनी 1 लाख 60 हजार रुपयांची मागणी गाळाधारकाकडे केली होती. गाळाधारकाने याबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून भाजप नगरसेविका वर्षा भानुषाली यांना 50 हजार रुपयांचा पहिला हप्ता लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.