पालघर - एका गरोदर महिलेला लोकलमधून रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी एका रिक्षाचालकाने विरार रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या लोकलच्या डब्यापर्यंत रिक्षा नेली. हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे.
गरोदर महिलेच्या मदतीसाठी चक्क रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर धावली रिक्षा विरारमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरात संपूर्ण पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अशात रविवारी सकाळी ९ वाजता विरारमधील एक गरोदर महिला ही आपल्या पतीसह मुंबई येथील एका रुग्णालयात जाण्यास निघाली होती. मात्र, लोकल सुरू होण्याआधीच महिलेला प्रसुतीच्या कळा जाणवू लागल्याने तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते.
यावेळी तेथे उपस्थित मुंबई पोलिसात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने मदतीसाठी रिक्षा थांब्यामध्ये असलेल्या सागर गावड (३४) या रिक्षाचालकास मदतीसाठी बोलावले. त्यानंतर थेट फलाट क्रमांक दोनवर अपंगांच्या डब्यात असलेल्या महिलेपर्यंत रिक्षा नेण्यात आली. महिलेला रिक्षातूनच नजीकच्या संजीवनी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे दाखल केल्यानंतर अवघ्या १० मिनिटांतच तिची सुखरूप प्रसूती करण्यात आली.
मात्र, लोहमार्ग पोलिसांनी रिक्षाचालक सागर याच्यावर रिक्षा थेट रेल्वे फलाटावर नेल्यामुळे रेल्वेच्या कायद्यान्वये १५४ आणि १५९ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानुसार रिक्षाचालक सागरला वसई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता झालेली सर्व हकीकत न्यायालयासमोर सादर केल्यानंतर मदतीसाठी रिक्षा फलाटावर नेल्याचे समोर आले. त्यामुळे न्यायालयाने रिक्षाचालक सागरवरील सर्व गुन्हे माफ केल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.