पालघर -जिल्ह्यातील डहाणू येथे भरधाव कारने नागरिकांना धडक देत हिट अँड रनचा प्रकार समोर आला आहे. भरधाव कारने काही नागरिकांना धडक दिली असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कार चालवणारी व्यक्ती पोलीस अधिकारी असून वाणगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला अटक करण्यात आली आहे.
चिंचणी ते डहाणू दरम्यान भरधाव कारने नागरिकांना दिली धडक
चिंचणी ते डहाणू अशा प्रवासादरम्यान एका भरधाव कारने धडक देत काही पादचाऱ्यांना जखमी केले. वाहनचालकाने कार न थांबवता तशीच पुढे दामटली आणि एका दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर ती कार तीन चाकांवर सुमारे 18 किलोमीटरपर्यंत धावत डहाणू पोलीस ठाण्यात थांबली. यानंतर कार चालक भिंतीवरून पळून गेल्याचे सांगितले जाते. ही कार डहाणू पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुहास खारमाटे यांच्या नावावर असून कारमध्ये पोलिसाची टोपीही आढळून आली आहे. भरधाव कारच्या धडकेत जखमी झालेल्या एकाची प्रकृती ही चिंताजनक असल्याने त्या व्यक्तीला नानावटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.