पालघर: १५ सप्टेंबर २०१० साली खैरपाडा येथील ताई पाटील चाळीत राहणाऱ्या मुख्य आरोपीने पांधारी शामू राजभर (वय २५) याचा गळा आवळून खून केला होता. आरोपींनी त्याचे दोन्ही हात बांधून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह फेकून दिला होता. त्यावेळी माणिकपूर पोलिसांनी हत्या, हत्येचा पुरावा नष्ट करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठांनी गुन्ह्यांतील फरारी आरोपीला पकडण्यासाठी विशेष शोधमोहीम राबवून त्यांचा ठावठिकाणा शोधून काढला. यानंतर आरोपीला अटक करण्याबाबतच्या सूचना व मार्गदर्शन केले होते.
का केला खून? माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे आणि गुप्त बातमीदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारे फरार आरोपी संजय गामा भारद्वाज (वय ३९) याला अंधेरी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता मयत इसमाने आरोपीस ५ हजार रुपये एडव्हान्स स्वरूपात दिले नव्हते. या रागातून आरोपीने त्याच्या साथीदारांसह मयत राजभरला कारमध्ये बसवून रुमालाने गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर रुमालाने मयताचे हात पाठीमागे बांधून त्यास ससूनघर गावच्या हद्दीत मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मातीच्या ढिगाऱ्याजवळ फेकून दिले होते.