पालघर - शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी बंड करून आपला नवीन गट स्थापन केल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक आमदार व शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले. यामध्ये पालघर जिल्हा सुद्धा मागे राहिला नाही. पालघर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु शिंदे गटात शिवसेनेचे अनेक पदाधिकारी विद्यमान आमदार व खासदार सामील झाल्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. शिंदे गटात सामील झालेल्या पालघर जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी करून त्यांच्या जागी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
'हे' आहेत नवनियुक्त पदाधिकारी :पालघर शिवसेना उपनेतेपदी उदय बंधू पाटील, पालघर भिवंडी ठाणे समन्यवयकपदी उत्तम पिंपळे, पालघर लोकसभा जिल्हासंपर्क प्रमुखपदी केतन पाटील, पालघर लोकसभा जिल्हासह संपर्कप्रमुखपदी निलेश गंधे, पालघर विक्रमगड विधानसभा जिल्हाप्रमुखपदी वैभव संखे, वसई- नालासोपारा विधानसभा जिल्हा प्रमुखपदी पंकज देशमुख, आणि डहाणू -बोईसर विधानसभा जिल्हा प्रमुखपदी वसंत चव्हाण, या नवीन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पालघर जिल्ह्यात शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांनी जाहीर केल्याचे एका प्रसिद्धस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.