पालघर - भूकंपाने गावं हादरलं, घराची पडझड झाली. तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री दादा भुसे यांचे पाहणी दौरेही झाले. मदतीचे आश्वासन आणि उपाययोजनांबाबत बोलणी झाली मात्र, प्रत्यक्ष मदत काही मिळाली नाही. ही तक्रार आहे पालघरच्या डहाणू तलासरी भूकंपप्रवण क्षेत्रातील सासवद गावाच्या अंती धर्मा डोंभरे या महिलेची. भूकंपाने या महिलेच्या घराचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तिला सरकारी मदतीची अपेक्षा आहे.
भूकंपाने खचलेल्या घराला आधार द्यायचाय; मदतीसाठी महिलेची याचना - डहाणू तलासरी भूकंप न्यूज
पालघर जिल्ह्यात डहाणू तलासरी हा भूकंप प्रवण परिसर आहे. या ठिकाणी वारंवार भूकंपाचे धक्के बसतात व त्यामुळे रहिवाशांचे नुकसानही होते. मात्र, त्यांना सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत महिने घालवावे लागतात.
पालघर जिल्ह्यात डहाणू तलासरी भागात वारंवार भूकंपाचे धक्के बसतात. या धक्क्यांमुळे नुकसान झाल्यास शासकीय यंत्रणेकडून या भागात पाहणी केली जाते. मदतीचे आश्वासनही दिले जाते. काही दिवसांपूर्वी असाच काहीसा जोरदार धक्का सासवद भागात बसला. यामुळे नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले. अंती धर्मा डोंभरे यांच्या घराची भूकंपाच्या धक्क्याने भिंत कोसळली. भूकंपाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी डहाणूचे तहसीलदार, प्रांताधिकारी आणि पालघरचे नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसल यांनी भेटी दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी भूकंपप्रवण क्षेत्रात भूकंपरोधक घरांची बांधणी केली जाईल, सबरी योजनेतून घरकुल योजनेचा लाभ देण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर पालकमंत्री तथा कृषीमंत्री दादा भुसे यांनीदेखील या भागाचा दौरा केला. त्यांनीही मदतीचे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्ष मदत मिळाली नाही. 'मला घर बांधायचे आहे विटा, सिमेंट आणि पत्रे आणायचे आहेत. पावसाळा आहे, घरात लहान मुले आहेत, त्यामुळे लवकरात लवकर मदत करण्याची याचना अंती डोंभरे आणि त्यांच्या घरातील सदस्यांनी केली आहे.