पालघर -मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या सेवेसाठी असलेल्या आयआरबी कंपनीच्याच रुग्णवाहिकेने चिंचपाडा - बऱ्हाणपूर मार्गावर दुचाकीस्वरांना धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. अपघात घडल्यानंतर जखमींना कोणतीही मदत न करता रुग्णवाहिका चालक पळून गेल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
अपघातग्रस्त रुग्णवाहिका आणि दुचाकी हेही वाचा -Mumbai Corona Update : मुंबईत आज ४२९ नव्या रुग्णांची नोंद, २ रुग्णाचा मृत्यू
रुग्णवाहिकेने दिली दुचाकीला धडक
पालघर तालुक्यातील नानीवली येथे राहणारे तुकाराम बाबू शेलार (वय ५३) हे आपली पत्नी आणि लहान मुलीसह घराकडे परतत असताना मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गजवळ बऱ्हाणपूर - चिंचपाडा रस्त्यावर दुचाकीला भरधाव वेगात येणार्या आयआरबी कंपनीच्या रुग्णवाहीकेने समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दुचाकी चालक तुकाराम शेलार यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी तनुजा शेलार आणि लहान मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी गुजरातमधील वापी येथील हरीया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर रुग्णवाहिका चालक फरार
अपघातानंतर आयआरबी कंपनीच्या रुग्णवाहिका चालकाने मात्र असंवेदनशीलतेचा कळस गाठत जखमींना तसेच सोडून घटनास्थळावरून रुग्णवाहिकेसह पळ काढला. यामुळे परिसरातील नागरिकांनी या विरोधात संताप व्यक्त केला आहे. रुग्णवाहिका चालक आणि आयआरबी कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील स्थानिकांनी केली आहे. अपघातग्रस्त रुग्णवाहिका चारोटी टोलनाक्याजवळ पोलिसांना सापडली असून रुग्णवाहिका चालकाला कासा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा -राज्यात सव्वा कोटी क्विंटल धान खरेदी, २६०० कोटी शेतकऱ्यांचा खात्यात जमा