पालघर- माहीम ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाघुळसार नजीक 'कांचन पारिजात' या इमारतीच्या 201 क्रमांकाच्या सदनिकेत, पालघर नगरपरिषदेच्या भारत बांधकामाच्या अनेक फाईल्स, शिक्के आदीसह महत्वपूर्ण कागदपत्रे आढळली आहेत. या इमारतीतील सदनिकेत दुसरे नगरपालिका कार्यालयच स्थापन करण्यात आल्याचे घटनास्थळी मिळालेल्या कागदपत्रांवरून दिसून येते.
कांचन पारिजात या इमारतीमधील 201 क्रमांकाची सदनिका नगर परिषदेमध्ये पूर्वी कार्यरत असलेले माजी अभियंता भालचंद्र क्षीरसागर यांच्या ताब्यात आहे. या सदनिकेत नगर परिषदेच्या शेकडो फाइल, महत्त्वाचे दस्तावेज, शिक्के आणि तेथील संगणकामध्ये महत्त्वपूर्ण माहिती असल्याची माहिती काही नगरसेवकांना मिळाली होती. क्षीरसागर यांची तीन महिन्यांपूर्वी इतरत्र बदली झाल्यानंतरही ते अधूनमधून पालघरमध्ये येते होते. त्यावेळी जुन्या प्रकरणांना त्यांच्या कार्यकाळातील तारीख टाकून परवानगी देत असल्याची माहिती काही नगरसेवकांना मिळाली होती. त्यानंतर भाजपचे गटनेते भावानंद संखे, नगरसेवक अमोल पाटील, अरुण माने हे कुणालाही न सांगता या सदनिकेत शिरले. तेथे काही वास्तुविशारद, विकासक व ठेकेदार आपल्या प्रलंबित प्रकरणांविषयी चर्चा करत असल्याचे त्यांना आढळले. त्याचबरोबर पालघर शहरातील गेल्या तीन-चार वर्षांतील महत्त्वाच्या बांधकाम प्रकल्पांची कागदपत्रे आणि यंदाच्या जूनमधील बांधकाम परवानगीसंदर्भातील महत्त्वपूर्ण दस्तावेजही तेथे नगरसेवकांना आढळले.