पालघर-अल्फा मेटल कंपनीचे व्यवस्थापक आरिफ मोहमद अली यांची अपहरणकर्त्यांकडून जाळून हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरिफ यांची हत्या करून जाळून फेकल्याची आरोपींनी कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. प्रशांत संखे, समदेव संखे या दोघांना वापी गुजरात येथून तर प्रशांत महाजन याला अमळनेर येथून अटक करण्यात आली आहे.
अल्फा मेटल कंपनीचे व्यवस्थापक आरिफ मोहम्मद यांची हत्या; अपहरणकर्त्यांनी जाळले - पालघर
प्राथमिक माहितीनुसार व्यावसायिक वादातून ही हत्या झाल्याचे कळते. मात्र, हत्येचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. मुख्य आरोपी प्रशांत संखे तसेच रामदेव संतोष संखे यास गुजरातमधील वापी येथून व प्रशांत गोरख महाजन यास अमळनेर, जळगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
९ मे रोजी दिवसाढवळ्या पालघर येथील जुना सातपाटी रोड येथून आरिफ मोहम्मद यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर प्रत्यक्षदर्शींच्या तक्रारीनुसार पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुपारी २ च्या सुमारास आरिफ यांना रिक्षा मधून अडवून जबरदस्तीने पांढऱया रंगाच्या स्कॉर्पिओ मधून अपहरण करण्यात आले होते.
आरिफ यांची हत्या करून जाळून फेकल्याची आरोपींनी कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली, असली तरी आरिफ यांचा मृतदेह घटनास्थळी पोलिसांना आढळून आला नाही. व्यावसायिक वादातून अपहरण करून हत्या केल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केल्याने आरिफ यांची हत्या झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.