पालघर-पालघर तालुक्यातील माहीम (कापूरवाडी) येथील एका आदिवासी शेतमजुराच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत 91.40 टक्के गुण मिळविले आहेत. रुपेश होरो, असे या विद्यार्थ्यांचे नाव असून कुठलाही खासगी क्लास न लावता स्वयंअध्ययनाने त्याने हे यश संपादन केले आहे. रुपेशच्या यशाबद्दल त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
आदिवासी शेतमजुराच्या मुलाने मिळविले 91.40 टक्के गुण... माहीम येथील भुवनेश कीर्तने महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या रुपेश राजेश होरो हा आदिवासी (वारली) समाजातील एका गरीब कुटुंबातील मुलगा. माहीम-कापूरवाडी परिसरात राहणाऱ्या रुपेशच्या कुटुंबात वडील शेतमजूर, आई घरकाम तर दोन लहान बहिणी शाळेत शिक्षण घेत आहेत. कुटुंबाचा सर्व खर्च वडिलांच्या 6 हजारातून भागवत, आई घरातील जबाबदारी पार पाडते.
राजेशला मुळातच अभ्यासाची खूप आवड. मात्र, परिस्थितीमुळे राजेशच्या शिक्षणाला काही मर्यादा येत असल्याचे इयत्ता 9 वीत असताना, त्याच्या वर्गशिक्षिका असलेल्या प्राजक्ता पाटील यांच्या लक्षात आले. हुशार असूनही त्याला आर्थिक परिस्थितीमुळे खासगी क्लासेसला जाणे शक्य नसल्याने त्यांनी रुपेशच्या शिक्षणाकडे शाळेतील शिक्षकांनी विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली. त्याला हवी असणारी अभ्यासाची पुस्तके, शैक्षणिक साहित्य आदींची मदत करत त्याच्यात यशस्वी होण्याचा विश्वास निर्माण केला.
आई-वडीलांनी रुपेशच्या शिक्षणासाठी घेतलेले कष्ट, शिक्षकांची साथ याच्या सहाय्याने रुपेशने रात्रंदिवस एक करीत अभ्यास केला. आत्मविश्वास व जिद्दीच्या जोरावर इयत्ता दहावीच्या परीक्षेत 91.40 टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. रुपेशने मिळविलेल्या या यशाबद्दल पंचक्रोषीत त्याचे कौतुक होत आहे. माहीम ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक करबट, उपसरपंच नरोत्तम राऊत आणि ग्रामविकास अधिकारी रमेश उंदरे यांनी देखील रुपेशच्या घरी भेट देत त्याचे अभिनंदन केले.
मला मिळालेले 91.40 टक्के गुणांचे श्रेय मी माझे आईवडील, शिक्षकांना देतो. यापुढे चांगले शिक्षण घेऊन शेतात राबराब राबून वडिलांच्या थकलेल्या हातांना मला आराम द्यायचा आहे. तसेच मला उच्च शिक्षण घ्यायची इच्छा असून रात्रंदिवस मेहनत करून पुढील शिक्षण मिळविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन असे रुपेशने सांगितले आहे.