पालघर -जिल्ह्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील सरळसेवा शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात यावी, या मागणीसाठी आदिवासी डीटीएड, बीएड कृती समितीच्या नेतृत्वात आदिवासी समाजातील डीटीएड, बीएडधारक विद्यार्थ्यांनी पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याबाबत वारंवार पत्रव्यवहार, निवेदन, आंदोलन करून सुद्धा त्याची दखल न घेतल्यामुळे आमरण उपोषणाचा पवित्रा या विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
'तोपर्यंत उपोषण असेच सुरू राहील' -
पालघर जिल्ह्यात पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या 1662 जागा रिक्त आहे. या जाग भरण्यात याव्यात यासाठी आदिवासी समाजातील डीटीएड, बीएडधारक विद्यार्थ्यांनी मागील दोन वर्षांपासून आंदोलने, निवेदने व पत्रव्यवहार करीत आहेत. 22 मार्च रोजी पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर या विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण केले. त्यावेळी शालेय शिक्षण विभाग मुख्य सचिवांची बैठक घेण्याचे लेखी पत्र देण्यात आले. मात्र, ही बैठक अद्यापही झालेले नाही. पालघर जिल्ह्यात पेसा शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, भरती प्रक्रिया पवित्र पोर्टल वरून न करता आदिवासी विकास विभागमार्फत स्थानिक पातळीवर घेण्यात यावी आदींसह विविध मागण्यांसाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील डीटीएड, बीएडधारक विद्यार्थ्यांनी पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत उपोषण असेच सुरू राहील, असा आक्रमक पवित्रा या विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
हेही वाचा- टीपीला अफगाण भूमीचा वापर करू न देण्याचे तालिबानचे आश्वासन; पाकचा दावा