पालघर(विरार) - दोन महिन्यापूर्वी बातमी दिल्याचा आकस मनामध्ये ठेवून विरारमध्ये पत्रकार विपुल पाटील यांना मारहाण झाली होती. या प्रकरणी विरार पोलिसांनी प्रभाकर ओघे, निखिल ओघे, बंटी ओघे व राजेश ओघे यांना अटक करून कारवाई केली. त्यांच्याकडून पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांना धोका निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. आरोपींनी पत्रकार विपुल पाटील व त्यांच्या कुटुंबियांची जाहीर माफी मागितली असून यापुढे त्यांना कोणताही त्रास न देण्याची हमी दिली.
विरारमध्ये पत्रकारासह कुटुंबाची आरोपींनी मागितली जाहीर माफी
बातमीचा आकस ठेवून विरारमधे पत्रकार विपुल पाटील यांना मारहाण झाली. या प्रकरणी विरार पोलिसांनी प्रभाकर ओघे, निखिल ओघे, बंटी ओघे व राजेश ओघे यांना अटक करून कारवाई केली. आरोपींनी पत्रकार विपुल पाटील व त्यांच्या कुटुंबियांची जाहीर माफी मागितली असून यापुढे त्यांना कोणताही त्रास न देण्याची हमी दिली.
या प्रकरणी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्रच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्हाध्यक्ष विजय देसाई यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे ही मागणी त्यांनी लावून धरली. पोलिसांकडूनही त्यांना सहकार्य मिळाले.
सध्या असलेले कोरोनाचे संकट लक्षात घेता सहायक पोलीस निरीक्षक शिवराम तुगावे, पोलीस उपनिरीक्षक खंडाळे यांनी दोन्ही बाजूच्या लोकांना एकत्र बोलावून सुवर्णमध्य काढला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर असलेला ताण वाढू नये. कायदा आणि सुव्यवस्था आबाधित राहावी यासाठी नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट महाराष्ट्रच्या अध्यक्ष शीतल करदेकर व पालघर जिल्हाध्यक्ष विजय देसाई यांनी पोलिसांच्या विनंतीला मान दिला. आरोपींनी पत्रकार विपुल पाटील व त्यांच्या कुटुंबियांची जाहीर माफी मागितली.