पालघर- भातशेतीचा कापणी हंगाम सुरू झाला की लागलीच परिसरातील आदिवासी समाज जंगलातील आणि अंगणातील बांबूचे बरखते तयार करीत असतात. कापलेल्या भातपिकाला बांधण्यासाठी तयार केलेल्या बांबूच्या साधनास बरखते म्हणतात. या बांबूपासून आदिवासी समाजाला रोजगार मिळत आहे.
भात कापणी सुरू झाली की शेतकऱ्यांना शेतावर आदिवासी मजुरांची गरज असते. त्यामुळे शेतकरी तलासरी, डहाणू, जव्हार या तालुक्यातून व नाशिक जिल्ह्यातून आदिवासी मजूर बोलवितो. त्यामुळे भातकुली हंगामात आदिवासी समाजाला रोजगाराचे साधन उपलब्ध होते.
पालघर जिल्ह्यात भात शेतीचा कापणी हंगाम सुरू झाला आहे. कापणी केलेल्या भात पिकाला (भाताचे भारे) बांधण्यासाठी बांबूपासून बनविलेले बरखते हे इथल्या प्रमुख बाजारपेठांमध्ये विक्रीस येत असतात. कच्च्या बांबूला तोडून ते उन्हात वाळवून त्याला पिके बांधण्यालायक बनविला जातो. इथला आदिवासी समाज हे बरखते बनविण्यासाठी भल्या पहाटे जंगलात किंवा इतरत्र जाऊन ही कामगिरी करत असतो. आदिवासींकडून हे बरखते शेकडा २०० रुपयांनी विकले जातात. शेतकरीवर्गही याची खरेदी करण्यासाठी गर्दी करत असतात. या बरखत्यांना पर्याय म्हणून कापडी पट्ट्या प्लास्टिक पट्ट्या विक्रीला ठेवल्या जातात.