पालघर- जव्हार येथील यशवंतनगर मोर्चा परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शेकडो आधार कार्ड पडलेली आढळली. ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यावर परिसरात खळबळ उडाली. ही आधार कार्ड नेमकी आली कोठून? आधार कार्ड कोणाची आहेत? त्या ढिगाऱ्यात कोणी टाकली? असे अनेक प्रश्न निर्माण विचारत आहेत.
कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मिळालेली सर्व आधार कार्ड ही वाळवंडा, चौक, आखरे, कऱ्हे, तलावली, काहडोळ पाडा या आदिवासी भागातील आहेत. या आदिवासी बांधवांची आधारकार्ड कित्येक वर्षे शासकीय यंत्रणेने त्यांच्यापर्यंत पोहचवली नाहीत. आधारकार्ड ही पोस्टाने आलेली असून कचऱ्याच्या ढिगात मिळालेल्या कागदांवर सन २०१२ सालचा शिक्का आहे. यावरुन हे लक्षात येते की, २०१२ पासून ही आधारकार्ड शासनाकडे पडून होती.
पोस्टाच्या अधिकाऱ्यांनी ही आधारकार्ड नागरिकांपर्यंत का पोहोचवली नाहीत? ही आधार कार्ड इतकी वर्षे धुळीत का पडली होती? या मागे नेमकी काय कारणे आहेत? या प्रकारानंतर आधार कार्डच्या वाटपातील शासकीय यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची करण्याची मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे.
नागरिकांनी याबाबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिली. प्रसारमध्यांनी तहसीलदार संतोष शिंदे यांना याबाबत कळवले. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. तहसीलदारांनी सबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन घटनास्थळाचा पंचनामा करण्यास सांगितले. तहसीलदारांच्या आदेशांनंतर जव्हार टपाल कार्यालयाचे पोस्ट मास्तर व तलाठी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करुन त्यांनी आधार कार्ड ताब्यात घेतली. परंतु, याबाबत अधिक माहिती देण्याचे अधिकाऱ्यांनी टाळले.