पालघर - येथे एका जोडप्याने अतिशय साध्या पद्धतीने लग्न करून लग्नासाठी खर्चाचा निधी हा कोरोना रुग्णांसाठी खर्च केला आहे. एरिक लोबो, मालिन तुस्कानो असे या नवदाम्पत्याचे नाव आहे. अतिशय साध्या पद्धतीने लग्न करून कोरोना रुग्णांसाठी आवश्यक त्या वस्तू देऊन या नवदाम्पत्याने एक आदर्श घालून दिला आहे.
कौतुकास्पद ! साधेपणाने लग्न करून 'त्यांनी' कोरोना रुग्णांसाठी खर्च केला निधी
नंदाखाल येथील एरिक लोबो आणि घास येथील मालिन तुस्कानो या जोडप्याने त्यांचे लग्न अत्यंत साध्या पद्धतीने करत लग्नाचा खर्च कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी खर्च केला. त्यांनी रुग्णालयात उपयोगी पन्नास खाटा, गाद्या व उशा असे साहित्य वसईचे उपविभागीय अधिकारी स्वप्निल तांगडी व आमदार क्षितीज ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले.
नंदाखाल येथील एरिक लोबो आणि घास येथील मालिन तुस्कानो यांचा विवाह 20 जूनरोजी संत गोंसालो गासिया चर्च गास येथे धार्मिक रिती रीवाजानुसार पार पडला. सध्या सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजविला आहे. त्या पार्श्वभूमीवर करण्यास आलेल्या लॉक डाऊनमुळे सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटून गेली आहे. सरकारसह अनेक दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आपापल्या परीने रुग्णांना मदत करत आहेत. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्याकरता शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत लग्नसोहळ्यावर लाखे रुपये खर्च करून आपण आपला संसार सुरू करावा हे एरीक लोबो मालिन तुस्कानो यांच्या मनाला पटले नाही. त्यांनी लग्न साधेपणाने करून कोरोना रुग्णांसाठी मदत करण्यात ठरविले आणि प्रत्यक्ष कृतीतही उतरविले. लग्नासाठी आवश्यक असलेल्या खर्च करून त्यांनी, कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी पन्नास खाटा, गाद्या व उशा असे गरजोपयोगी साहित्य वसईचे उपविभागीय अधिकारी स्वप्निल तांगडी व आमदार क्षितीज ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले. आपल्या या कृतीने सामाजिक बांधिलकी जपतानाच त्यांनी एक आदर्शही घालून दिला आहे.