पालघर:मुंबई अहमदाबाद महामार्गावरून घाटकोपर येथून उदयपूरला जाणाऱ्या धावत्या खाजगी स्लीपर कोच बसमध्ये एका प्रवाशाच्या गळ्यावरती वार करून रक्तबंबाळ असलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळला आहे. या प्रवाशाला कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत असल्याचे घोषित केले आहे. घाटकोपर येथून निघालेली ही बस उदयपूर येथे जात असताना डहाणू तालुक्यातील चारोटी येथे ही घटना उघडकीस आली आहे.
प्रवासी रक्ताच्या थारोळ्यात: स्लिपर कोच असणाऱ्या या बसमध्ये घोडबंदर येथे हा प्रवासी खाजगी बसमध्ये चढला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान डहाणू तालुक्यातील चारोटी नाक्याच्या पुढे लघवी करण्यासाठी काही प्रवासी बसमधून खाली उतरले असता, त्याच्या बुटाला रक्त लागल्याने शोध घेतल्याच्या प्रक्रियेत एक प्रवासी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. बस चालकाने त्याला कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी बस वळवली.