डहाणू (पालघर) - तालुक्यातील पहिली कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तीन वर्षीय चिमुकलीने अखेर कोरोनावर मात केली आहे. तिचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने आज (शनिवारी) तिला डहाणूतील कॉटेज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी डॉक्टरांसह हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ आणि टाळ्या वाजवून तिचे अभिनंदन केले.
डहाणू तालुक्यातील गंजाड परिसरात राहणारी तीन वर्षीय चिमुकली वीट भट्टीवर काम करणाऱ्या आपल्या आई-वडिलांसह पालघरमधील काटाळे भागात राहत असताना तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या 200हून अधिक जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहेत. त्यापैकी 7 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या चिमुकलीवर डहाणू येथील कॉटेज रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर तिचे 7व्या, 13व्या आणि 14व्या दिवशी करण्यात आलेले कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने तिला आज (रविवारी) डिस्चार्ज देण्यात आला.