पालघर/वसई - नालासोपारमध्ये रेल्वेखाली येऊन एकाच घरातील चार जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात दोन महिलांसह एका पुरूषाचा मृत्यू झाला असून दहा वर्षीय चिमूकली गंभीर जखमी झाली आहे. लोहमार्ग पोलिसांना 10 वर्षीय चिमुरडी गंभीर अवस्थेत सापडली आहे. तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आर्थिक समस्येला कंटाळून संपूर्ण कूटूंबाने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. विरार पूर्व साईनाथ नगर येथे पोपट धोंडीराम जंगम हे पत्नी, मुलगा ,मुलगी व नातीसह राहतात. शनिवारी सकाळी साडे पाच वाजता पोपट जंगम व्यतिरिक्त इतर चार जण घराबाहेर फिरण्याच्या निमित्ताने बाहेर पडले. त्यांनी थेट वसई ते नालासोपारा दरम्यान वसईच्या दिशेने जाणाऱया मालगाडीखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नंदा जंगम (55), प्रमिला जंगम (35), सोमनाथ जंगम (31) या तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर समीक्षा खडतरे ही 10 वर्षांची चिमुकली मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या जखमी असलेल्या मुलीवर नालासोपारा येथील अलायन्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून तिन्ही मुतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. आर्थीक अडचणींतून या तिघांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा टोकाचा विचार केल्याचा प्राथमीक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.