पालघर- वसईत एकाच दिवशी विविध ठिकाणी पाण्यावर तरंगताना 3 जणाचे मृतदेह आढळले आहेत. यातील एक मृतदेह महिलेचा तर 2 मृतदेह पुरुषांचे आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
वसईत एकाच दिवशी विविध ठिकाणी पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू
वसईत एकाच दिवशी विविध ठिकाणी पाण्यात बुडालेले 3 मृतदेह आढळले आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
वसई पश्चिम के.टी. थिएटरच्या पाठीमागील एका खड्ड्यात साचलेलया पाण्यात एका 35 वर्षाच्या व्यक्तीचा मृतदेह गुरुवारी सकाळी 7 वाजता आढळला. विजय शांताराम बुरकुल असे त्याचे नाव असून तो वसईतील नावपाडा परिसरातील आहे. दारूच्या नशेत खड्ड्यात पडून त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. तर दुपारी 3 च्या सुमारास वसई पूर्व नवघर परिसरात रेल्वेच्या चालू बांधकामाच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात 25 ते 30 वर्षाच्या अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला आहे. या दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन माणिकपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुपारी 4 च्या सुमारास वसई येथील नायगाव खाडीत एका 40 ते 45 वयोगटातील महिलेचा मृतदेह सापडला आहे. याबाबत वालीव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एकाच दिवशी एक महिला आणि 2 पुरुषांचे असे तीन मृतदेह सापडले असल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या व्यक्तींना कोणी मारून टाकले, की यांनी आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत.