पालघर - सिल्वासा पोलिसांच्या ताब्यातून 3 आरोपीं फरार झाल्याची घटना घडली आहे. या आरोपींना ठाण्याच्या कारागृहात घेऊन जात असताना त्यांनी पळ काढला असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पालघर पोलीस या आरोपींच्या शोधासाठी कोंबिंग ऑपरेशन राबवत आहे. विशेष म्हणजे हे आरोपी आंतरराज्यीय दरोडेखोर आहेत. या प्रकरणी वालिव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिल्वासा पोलिसांच्या ताब्यातून 3 आरोपी फरार, शोध सुरू
जयराम लखमा दळवी (२१), गणेश उर्फ बोक लखमा दळवी (२०, दळवी पाडा, तलासरी तालुका), मार्टीन राजा माढा (३०, मेढा पाडा, तलासरी तालुका) हे आरोपी फरार झाले आहेत.
याबाबत अधिकची माहिती अशी की, सिल्वासा पोलीस तिन्ही आरोपींना घेऊन मुंबईच्या दिशेने जात होते. त्यावेळी सातिवलीच्या पूलाजवळ अचानक एका आरोपीला उलटी आली. त्यामुळे तेथे गाडी थांबवण्यात आली. यावेळी दोन आरोपींनी पोलिसांकडे लघुशंकेसाठी परवानगी मागितली. याच क्षणाचा फायदा घेत 3 आरोपी फरार झाले. जयराम लखमा दळवी (२१), गणेश उर्फ बोक लखमा दळवी (२०, दळवी पाडा, तलासरी तालुका), मार्टीन राजा माढा (३०) हे आरोपी फरार झाले.
हे आरोपी आंतरराज्य दरोडेखोरांच्या टोळीतले दरोडेखोर असून त्यांच्यावर पालघरच्या तलासरी व बोईसर आणि इतर राज्यात दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी पालघर पोलीस आता तिन्ही आरोपींच्या शोधासाठी तुंगारेश्वरच्या डोंगरी भागात कोंबिंग ऑपरेशन राबवत आहे.