पालघर- जिल्ह्याच्या गडचिंचले येथील लिचिंग प्रकरणातील सर्व ११ आरोपींना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात त्यांच्यासह कोरोनाचे 26 नवे रुग्ण आढळले आहेत. गडचिंचले प्रकरणातील 11 आरोपींचे स्वॅब 13 जून रोजीघेण्यात आले होते. यात अकराही आरोपी पॉझिटिव्ह असल्याची माहिती वाडा तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बुरपुले यांनी दिली.
आज आढळलेल्या 26 कोरोना रुग्णांपैकी वाडा तालुक्यात 11, जव्हारमधील 12, डहाणूतील 1, पालघर येथील 2 जणांचा समावेश आहे. यात 3 महिला व 23 पुरुष आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आज सकाळ पर्यंत 434 झाली आहे. ही माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
या अगोदर वाडा पोलीस ठाण्यात पालघरमधील वाडा तालुक्याच्या गडचिंचले येथील कथित तिहेरी हत्याकांड प्रकरणातील एका आरोपीला कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी आरोपीसह पोलीस कर्मचारी यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर वाडा पोलीस ठाण्यात दुसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे.
वाडा पोलीस ठाणे आणि वाडा तहसील कार्यालय हे एकाच परिसरात असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने वाडा तहसील कार्यालय 2 दिवस बंद ठेऊन येथील कारभार नजीकच्या प्रांत कार्यालयातून सुरू राहील, असे वाडा तहसीलदार उद्धव कदम यांनी सांगितले.
त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी वाडा तालुक्यातील ब्लूस्टार कंपनीत पालघर जिल्ह्याबाहेरील एका कामगाराला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या संपर्कातील 11 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.