पालघर -तलासरी येथील कुर्झे धरणात काही दिवसांपूर्वी निलेश उर्फ दिनेश चुनिलाला रावल (वय २९) या व्यापाऱ्याचा मृतदेह आढळून आला होता. अवघ्या 12 हजार रुपयासाठी या व्यापाऱ्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
हत्या करून धरणात फेकण्यात आला मृतदेह -
निलेश उर्फ दिनेश चुनिलाल रावल हे गुजरात मधील उंबरगाव येथील होलसेल तेलाचे व्यापारी आहे. ते उद्धवा आणि तलासरी शहरात येऊन किराणा दुकानदारांकडे तेलाचे ऑर्डर बुक करत असत, तसेच शेवटच्या थकबाकीच्या ऑर्डरची देयके घेण्यासाठी येत असत. 3 नोव्हेंबर रोजी ऑर्डर घेण्यासाठी आलेले निलेश रावल हे घरी परतलेच नाही. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी 4 नोव्हेंबर रोजी मुलगा हरवल्याची तक्रार तलासरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. 8 नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास तलासरी येथील कुर्झे धरणात एक मृतदेह तरंगताना गावकऱ्यांना आढळून आला होता. त्यानंतर चौकशी केली असता मृतदेह निलेश उर्फ दिनेश चुनिलाला रावल यांचा असल्याचे उघड झाले होते.