पालघर - अल्फा मेटल कंपनीचे मालक आरिफ मोहम्मद अली शेख यांचा ९ मे रोजी खून झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने शनिवारी ११ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.
आरिफ मोहम्मद अली शेख खूनप्रकरण; ११ जणांना न्यायालयीन कोठडी
अल्फा मेटल कंपनीचे मालक आरिफ मोहम्मद अली शेख खून प्रकरणी ११ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पालघर न्यायालयाचे सह न्यायाधीश एस. जे. लाड यांनी सरकारची आणि आरोपीच्या वकिलांची बाजू ऐकल्यानंतर ही कोठडी सुनावली. न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्व आरोपींची रवानगी ठाणे कारागृहात करण्यात आली आहे. यापूर्वी या प्रकरणातील ११ आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर सह न्यायाधीश एस. जे. लाड यांच्या समोर झालेल्या सुनावणीत त्यांनीही या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.
अल्फा मेटल कंपनीचे मालक मोहम्मद अली शेख यांचे अपहरण करुन खून केल्याचा प्रकार ९ मे रोजी उघडकीस आला होता. याप्रकरणी आधी ४ आणि नंतर ७ आरोपींना अटक करण्यात आली. दरम्यान, यातील एका आरोपीने आत्महत्या केली. यानंतर हत्या प्रकरणी सर्व आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. या प्रकरणांमध्ये अजून तपास बाकी असून तो तपास पूर्ण करण्यासाठी या आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांमार्फत न्यायालयाकडे करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.