महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तांड्यावरच्या मुलांना बोली भाषेतून शिक्षण, 51 ऑफलाईन अॅप बनवणाऱ्या खोसे गुरुजींचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान - उमरगा तालुक्यातील शिक्षक

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्यावतीने देशातील 45 शिक्षकांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यापैकी मराठवाड्यातील  एकमेव शिक्षक म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कडदोरा गावचे जिल्हा परिषद शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांना हा बहुमान मिळाला आहे.

51 ऑफलाईन अॅप बनवणाऱ्या खोसे गुरुजींचा
51 ऑफलाईन अॅप बनवणाऱ्या खोसे गुरुजींची शाळा

By

Published : Aug 21, 2021, 9:26 AM IST

Updated : Aug 21, 2021, 9:50 AM IST

उस्मानाबाद - शिक्षक म्हणजे समाजाचा खरा शिल्पकार असतो. चांगल्या शिक्षणाने व्यक्तीमत्व बदलते आणि घडते. त्यातून समाजाची जडणघडण होण्यास हातभार लागतो. ही दूरदृष्टी दाखवणारे आणि विद्यार्थ्यांना त्यासाठी पात्र करणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक होय. त्यातही एखादा शिक्षक आपल्या अध्यापन कार्यात स्वत:ला झोकून देऊन उपलब्ध साधनांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना घडवण्याचे कार्य करत असतो. असा शिक्षकांच्या कार्याची दखल जिल्हा राज्यपातळीसह देशपातळीवरही घेतली जाते. अशा शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले जाते. त्यापैकीच एक म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्याच्या जिल्हा परिषद शाळेत ज्ञानदान करण्याचे काम करणारे 'उमेश खोसे' सर यांचाही केंद्र सरकारने गौरव केला आहे. त्या अनुषंगाने ईटीव्ही भारतने घेतलेल्या त्यांच्या अद्यापन कार्यावरील हा विशेष वृत्तांत..

तांड्यावरच्या मुलांना बोली भाषेतून शिक्षण

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्यावतीने देशातील 45 शिक्षकांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यापैकी मराठवाड्यातील एकमेव शिक्षक म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कडदोरा गावचे जिल्हा परिषद शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांना हा बहुमान मिळाला आहे. यापूर्वीही खोसे यांना केंद्र सरकारचा राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार जाहीर झाला आहे. एका वर्षात खोसे यांना राष्ट्रीय पातळीवरचे दोन पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

तांड्यावरच्या मुलांसाठी 51 ऑफलाईन अॅप्सची निर्मिती

ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी ज्या तांड्यावर मोबाईलला रेंज नव्हती अशा ठिकाणच्या मुलांना ऑफलाईन शिकता यावे, मनोरंजक अध्ययन करता यावे, यासाठी 51 ऑफलाईन अॅप्सची निर्मिती केली आहे. तसेच मुलांच्या साहाय्याने व्हिडिओ निर्मिती करून मुलांना स्वयं अध्ययनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. तांड्यावरील मुलांना त्यांच्याच बोली भाषेतून शिक्षण मिळावे यासाठी त्यांच्याच बंजारा बोली भाषेत पहिलीचे पुस्तक अनुवादित करून त्याच भाषेत डिजिटल साहित्य निर्माण केले आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी, 5 पुस्तके व 47 लेख प्रकाशित

बोलीभाषा व तंत्रज्ञान या उपक्रमाची निवड राज्यस्तरावरील शिक्षणाची वारी या उपक्रमात झाली होती. त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर रिसर्च पेपर सादरीकरण केले आहे. त्यांचे 5 पुस्तके व 47 लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी दीक्षा या केंद्रशासनाच्या अॅपवर इ कंटेंट तयार केले आहेत. त्यांनी व त्यांचे मुख्याध्यापक श्रीराम पुजारी यांनी राबविलेल्या शिक्षण संस्कार शिबिर नवोपक्रमास राज्यात प्रसिद्धी मिळाली आहे. त्यांनी राष्ट्रीय एकात्मता वाढीसाठी शाळेत वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत.

कोरोना काळात खोसे गुरुजींची शाळा 365 दिवस सुरूच

ग्रामीण भागातील मोलमजुरी करणारे लोकांनी दिलेले योगदान, तसेच ग्रामपंचायत व इतर संस्थेच्या माध्यमातून लोकवाट्यातून त्यांच्या दोन्ही शाळा डिजिटल आहेत. टॅब स्कुल करून मुले वेगवेगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरून आनंददायी शिक्षण घेऊ लागले. मुलांना आनंददायी शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी ऑफलाईन अँप्स, गेम्स, टेस्ट तयार केलेल्या आहेत. तसेच कोरोनाच्या काळात त्यांची शाळा ऑनलाईन व ऑफलाईन 365 दिवस सुरू आहे.

ऑनलाईन निकाल लावणारी जिल्ह्यातील एकमेव जिल्हा परिषदेची शाळा-

मुले दीक्षा अॅप तसेच इतर साधनाच्या सहाय्याने नियमित शिक्षण घेत आहेत. आशा काळात त्यांनी शाळेची स्वतःची वेबसाईट तयार करून दोन्ही वर्षी दहावी बारावी प्रमाणे शाळेचा ऑनलाईन निकाल लावला आहे. ऑनलाईन निकाल लावणारी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची ही एकमेव शाळा आहे. आयएसओ उपक्रमशील, ऍक्टिव्ह स्कुल असलेल्या शाळेतील उपक्रमशील शिक्षक उमेश खोसे यांच्या या कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाच्या वतीने यावर्षी त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

गडचिरोलीचे शिक्षक खुर्शिद यांनाही मिळाला राष्ट्रीय पुरस्कार-

गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील असरअली येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक खुर्शिद शेख यांची केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशभरातून नामांकन केलेल्या १५५ शिक्षकांपैकी ४५ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्यात गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील असरअली येथील खुर्शिद शेख आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमेश खोसे या दोन शिक्षकांचा महाराष्ट्रातून समावेश आहे.

Last Updated : Aug 21, 2021, 9:50 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details