उस्मानाबाद - जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा कधीच संपताना दिसत नाहीत. गेली सुमारे एक महिन्यापासून पाऊस पडत नसल्याने जिल्ह्यातील सोयाबीन वाळून चालले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पोटाला चिमटा घेऊन कष्ट करायचे आणि लेकरासारखा जिव लावलेले पिक डोळ्यासमोर करपल्याचे पाहणे वेदनादाई असते. अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील निपाणी गावच्या 27 वार्षिय अशोक गुंड या तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आपले जिवन संपवले आहे. दरम्यान, या तरुणाने आत्महत्येपुर्वी व्हिडीओ तयार करून आपली व्यथा मांडली आहे.
आत्महत्येपूर्वी व्हिडीओतून मांडली होती व्यथा
अशोकने आठ दिवसांपूर्वी आपल्या शेतात एक व्हिडिओ काढला होता. त्याने आपल्या शेतातील वाळत असलेल्या सोयाबीनचा व्हिडीओ काढून समाज माध्यमात शेअर करत व्यथा मांडली होती. शेतातील सोयाबीनचा पूर्णपणे धुरळा झाला असून, प्रशासन आणि विमा कंपनीने याकडे लक्ष द्यावे असे आवाहन त्याने या व्हिडिओच्या माध्यमातून केले होते. त्याचबरोबर वाळून चाललेल्या पिकांची पाहणी करून पंचनामा करावा, अशी मागणीही या शेतकऱ्याने यामध्ये केली होती.
मराठवाड्यात नापिकीचे संकट तोंडावर काढत आहे