उस्मानाबाद- अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आई कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेला सुवर्णालंकार घालून देवीची पूजा करण्यात आली. दरवर्षी अक्षय तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यावर्षी कोरोनामुळे अक्षय तृतीया हा उत्सव साध्या पद्धतीने आणि भाविकांच्या अनुपस्थित साजरा करण्यात आला.
साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त तुळजाभवानी मंदिरात भाविकांची गर्दी असते. मात्र, टाळेबंदीमुळे भाविकांचा मंदिरात शुकशुकाट होता. श्री तुळजाभवानीला सकाळी दही, दुध, पंचामृतअभिषेक केल्यानंतर संपूर्ण सुवर्ण अलंकार घालण्यात आले होते. त्यानंतर तुळजाभवानी मातेला आंब्याच्या रस आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. तुळजाभवानीला आंब्याच्या रसाचा नैवेद्य दाखवल्यानंतरच शहरातील लोक आंब्याचा रस खाण्यास सुरुवात करतात.