उस्मानाबाद -तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथे सोयाबीनची मळणी करताना मुंडके मळणी मशीनमध्ये अडकून शीर धडावेगळे झाले. निलावती भगवान मारकड ( वय ६० वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
मळणी यंत्रात अडकून महिलेचे शीर झाले धडावेगळे.. पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा दाखल - उस्मानाबाद गुन्हे वृत्त
सोयाबीनच्या मळणी मशीनमध्ये मुंडके अडकून एका महिलेचे शीर धडावेगळे झाल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.
पावसाने उघडीप दिल्याने सध्या सोयाबीन काढण्याची लगबग सुरू आहे. त्यामुळे निलावती मरकड या स्वतःच्या शेतातील सोयाबीन भरडण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी गावातीलच मल्हारी सरवदे यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवरती चालणारे मशीन सोयाबीन भरडण्यासाठी बोलावण्यात आले होते. निलावती आणि त्यांचा मुलगा आणि सुनबाई सोयाबीन भरडण्यात त्यांची मदत करत होते. यावेळी निलावती यांचा हात अचानकपणे भरडण्याच्या मशीनमध्ये गेला हात काढण्याच्या प्रयत्नात त्यांचे मुंडके भरडण्याच्या मशीन बेल्टमध्ये अडकले आणि शीर धडापासून वेगळे झाले. या संदर्भात तामलवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल असून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.