उस्मानाबाद - यंदाही कोरोनामुळे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे शारदीय नवरात्र उत्सव साधेपणाने भक्ताविना साजरा होणार होणार असून नवरात्र काळात उस्मानाबाद जिल्ह्यात व तुळजापूर शहरात भाविकांना प्रवेश बंदी असणार आहे. नवरात्र काळात भक्तांना प्रवेश नसला तरी देवीच्या सर्व धार्मिक विधी अलंकार पूजा या विधीवत होणार आहेत. शारदीय नवरात्र महोत्सवात देशभरातून लाखो भाविक तुळजापुरात दाखल होत असतात. मात्र मागील 2 वर्षांपासून कोरोना या महामारीमुळे साध्या पद्धतीने नवरात्र महोत्सव पार पडत आहे.
मंदिरात फक्त 50 जणांना प्रवेश
तुळजाभवानी मंदिरात केवळ 50 जणांना धार्मिक विधीसाठी प्रवेश मिळणार असुन लसीकरण केलेलं असेल तरच त्या पुजाऱ्यांना प्रवेश मिळणार आहे. उस्मानाबाद जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व पुजारी मंडळ यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नवरात्र उत्सवात देवीचे महंत, सेवेकरी, पुजारी व इतर मानकरी यांनाच प्रवेश मिळणार आहे. कोविडच्या नियमानुसार तुळजाभवानी देवीच्या सर्व पूजा, अलंकार व विधी होणार आहेत. नवरात्र काळात भाविकांनी प्रवेश करू नये यासाठी उस्मानाबाद जिल्हा प्रवेश बंदी असणार तसेच तुळजापूर शहराच्या सर्व प्रवेशावर पोलीस बंदोबस्त असणार आहे.
भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा;जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
नवरात्र काळात अनेक भाविक मशाल घेऊन व पायी चालत दर्शनासाठी तुळजापुरात येतात. मात्र त्यांना प्रवेशबंदी असणार आहे. त्यामुळे भाविकांनी तुळजापूर शहरात येऊ नये व ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व पोलीस अधीक्षक निवा जैन यांनी केले आहे. या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नवनीत कुमार कॉवत, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सौदागर तांदळे, योगिता कोल्हे, प्रशासकीय अधिकारी इंतुले, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, नगर परिषद मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्यासह पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके उपस्थित होते