उस्मानाबाद - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या सीना-कोळेगाव धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत होती. मात्र मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे धरण तुडुंब भरले आहे. यामुळे धरणाचे ४ दरवाजे उघडून नदी पात्रात पाणी सोडले आहे. धरणातून सध्या 2500 क्यूसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील धरणे तुडुंब, सीना कोळगाव प्रकल्पातून विसर्ग सुरू
सीना कोळे गावधरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मागील काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे परांडा तालुक्यातील सीना-कोळेगाव धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू होती. त्यामुळे दिवसागणिक धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत होती. मंगळवारी रात्रभर आणि आज दिवसभर सतत पडणाऱ्या संततधारेमुळे हे धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन रात्रीच धरणाचे दोन दरवाजे उचलले. मात्र पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरूच असल्याने बुधवारी सकाळी आणखी दोन दरवाजे उचलून पाण्याचा विसर्ग वाढविला आहे.
तसेच जिल्ह्यातील मांजरा धरण 78 टक्के भरले असून तेरणा धरण दोन वेळा ओव्हरफ्लो झाले आहे. तर निम्न तेरणा मागणी प्रकल्प पावसामुळे कुठल्याही क्षणी भरून तेरणा नदी मार्गे पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे तेरणा नदी काठच्या गावांना, वस्त्यांना आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.