उस्मानाबाद -कृषी संस्कृतीची साक्ष जागवणारा वेळ अमावास्या हा सण आज उस्मानाबाद लातूर व कर्नाटकच्या काही भागात शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतो. जगाला पोसणाऱ्या काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी शेतकरी आजच्या दिवशी काळ्याआईची मनोभावे पूजा करून आपल्या शेतात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतो.
गाव व शहरांमध्ये असतो शुकशुकाट
सध्या शेतात गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, व तुरीचे पीक बहरात आलेले असते, बोर व शेंगा हा रानमेवा ही खाण्याजोगा झालेला आहे. या बहरलेल्या शेतात शेतकरी कडबा अथवा गवताची कोप बनवतो.पांडवांची प्रतिष्ठापना करतात या पांडवांना चुना व शेंदूर लावला जातो. हळद कुंकू यांनी पूजा केली जाते. या पूजेनंतर शेतामध्ये शेत चर शिंपला जातो. या वेळी हर हर महादेव या नामाचा जयघोष केला जातो. तसेच, जेवणाचा फक्कड बेत असतो. वरण, आमटी, भज्जी, आंबील, खीर, शेंगदाण्याच्या पोळ्या असे पदार्थ असतात. आंबील हे विशेष पेय व सर्व भज्यापासून बनवलेली भज्जी (भाजी) हे जेवणाचे खास वैशिष्ट्य असते. याचा स्वाद घेण्यासाठी शेतकरी आपल्या शेतात नातेवाईक मित्र व शेतकामाला मदत करणाऱ्या 12 बलुतेदारांना जेवणासाठी आमंत्रण केले जाते. आजच्या दिवशी जवळपास सर्वजण रानभोजनचा आनंद लुटण्यासाठी शेतात जातात. त्यामुळे गाव व शहरांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतो.