उस्मानाबाद - लोक कोणत्या गोष्टीचा कशासाठी वापर करतील याचा बिलकूल नेम नाही. कोरोना विषाणूला स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे सॅनिटायझर काहीजण कशासाठी वापरत आहेत, हे वाचल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. कोरोनाच्या काळात वेळोवेळी हात सॅनिटाईझ करणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यात काही ठिकाणी याचा भलताच वापर सुरू झाला आहे.
सॅनिटायझरची गरज लक्षात घेऊन जिल्हाभरातील ग्रामपंचायतींनी घरोघरी जाऊन मोफत सॅनिटायझर वाटले आहेत. परंतु, सध्या या सॅनिटायझरचा हात निर्जंतुक करण्यासाठी कमी अन् चूल पेटवण्यासाठी जास्त वापर केला जात आहे. मुंबई, पुणे यासारख्या शहरांमधून कोरोना विषाणू ग्रामीण भागातही पोहोचला. बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली त्यामुळे हात सॅनिटाईझ करण्याचा सल्ला वारंवार दिला जात आहे. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील लोकांमध्येही हात सॅनिटायझ करण्याचे प्रमाण वाढावे, या उद्देशाने ग्रामपंचायतींनी 14 व्या वित्त आयोगातून घरोघरी सॅनिटायझर तसेच मास्कही पुरवले.