उस्मानाबाद - कोरोनाचे बदलते ओमायक्रॉन स्वरूप हे धोकादायक ठरताना दिसत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ओमायक्रॉन ( Omicron Patients in Osmanabad District ) शिरकाव झाल्यानंतर 2 रुग्ण हे पॉझिटिव्ह सापडले आहेत. हे दोन्ही रुग्ण नात्याने पिता-पुत्र असून उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथील आहेत. 43 वर्षीय व्यक्ती परदेश दौऱ्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आली होती. मात्र, त्यांचा 16 वर्षीय मुलाचा आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह आला होता. पण, त्या मुलाचा ओमायक्रॉनचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह मात्र ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह असल्याने विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुल्ला यांनी केले आहे.
गावकऱ्यांचा चिंतेत भर
ओमायक्रॉनग्रस्त पुरुषांने परदेश दौऱ्यावरुन परतल्यानंतर व कोरोना निदान होण्यापूर्वी गावात विनामास्क फिरत अनेकांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली आहे.
गावात सीमाबंदीसह कलम 144 लागू
उस्मानाबाद जिल्ह्यातील बावी या गावात कोरोनाचे 3 रुग्ण सापडल्याने या गावाच्या सीमा बंद करून कलम 144 लागू करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर डॉ. योगेश खरमाटे यांनी काढले आहेत. बऱ्याच अवधीनंतर उस्मानाबाद जिल्ह्यात एखाद्या गावाच्या सीमा बंद करण्याचे आदेश दिल्याने पुन्हा एकदा कोरोनाची धाकधूक वाढली आहे. बावी या गावातील कोरोनाचा संसर्ग वाढू न देण्यासाठी तातडीने नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अनुषंगाने हे आदेश काढण्यात आले असून बावी गावाच्यापासून तीन किलोमीटर पर्यंतच्या परिसरातील नागरिकांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. 3 किलोमीटरचा पर्यंतचा परिसर रेड झोन तर 7 किलोमीटर पर्यंतचा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.